|| श्रींचे अवतारकार्य ||

मागील पान

भाकड म्हशीचे दुध ब्रम्हराक्षसाला मुक्ती व जयपत्र मागणारे मुर्ख ब्राम्हण
नरसोबाच्या वाडीस गुप्त झालेले महाराज गाणगापुरास प्रकट झाले व तेथे संगमावर राहू लागले. नित्यनियमानुसार एके दिवशी महाराज एका गरीब ब्राह्मणाच्या घरी भिक्षेस गेले. त्या ब्राह्मणाच्या साध्वी स्त्रीने महाराजांचे मनःपूर्वक व भक्तिभावाने आदरातिथ्य करून'आपला पती भिक्षेस गेला आहे त्वरितच भिक्षा घेऊन परत येईल तरी आपण बसावे.'अशी महाराजांना विनंती केली. 'तुझ्या घरी म्हैस आहे आम्हास भिक्षेस दूध घाल' असे महाराजांनी तिला सांगितले. 'म्हैस वांझ असल्यामुळे ती दूध देत नाही' असे त्युत्तर येताक्षणीच महाराजांनी आपल्या समक्ष दूध काढावयास बसण्याची आज्ञा त्या ब्राह्मण स्त्रीस दिली. महाराजांच्या आज्ञेनुसार ती स्त्री दूध काढावयास बसली आणि आश्चर्य हे की त्या वांझ म्हशीने दोन भांडी दूध दिले. ते धारोष्ण दूध तापवून तिने महाराजांस दिले. अशा प्रकारे वांझ म्हैस दुभती करून महाराजांनी त्या ब्राह्मण दाम्पत्यास 'पुत्रपौत्रश्रियायुक्त नांदाल' असा आशिर्वाद दिला. ही नवलकथा तेथील नगराधिपतीस कळल्यावर त्याने महाराजांना गावात येऊन वास्तव्य करण्याची विनंती केली व महाराजांनी ती मान्य केली. गावात येताना वाटेवरील एका घरी एका ब्रह्मराक्षसाचे वास्तव्य होते तो महाराजांस शरण आला. महाराजांनी त्याला मुक्त करून त्या जागेवर मठ बांधून तेथे त्यांनी वास्तव्य केले.

गाणगापुरापासून जवळ असलेल्या कुमसी नावाच्या गावी त्रिविक्रम भारती या नावाचा एक यती नरहरीची उपासना करीत असे. त्याने गाणगापुरातील महाराजांची चरित्रलीला ऐकली व महाराजांचे आचरण संन्यासाश्रमी यतीला अयोग्य आहे अशी निंदा करावयास प्रारंभ केला. महाराज त्याच्याकडे गेले व त्याला विश्वरूप दाखवून त्याच्या भ्रमाचे त्यांनी निरसन केले आणि त्याच्यावर कृपा केली.

आपल्या पांडित्याचा गर्व झालेल्या दोन ब्राह्मणांनी राजज्ञेने राज्यातील सर्व ब्राह्मणवृंदांना वादात पराजित केले व ते त्रिविक्रम भारतीकडे वाद करण्याच्या ईर्षेने आले. परंतु त्रिविक्रम भारतीने त्यांना महाराजांकडे आणले. ब्राह्मणांनी विद्येचा गर्व सोडून द्यावा असे त्यांना परोपरीने समजावून सांगितले असतादेखील ते आपला हट्ट सोडून देण्यास तयार होईनात तेव्हा त्याच समयी वाटेने जाणा-या एका अत्यंजाला महाराजांनी बोलाविले व भूमीवर सात रेषा काढून त्याला त्या रेषा ओलांडण्यास सांगितले. सातवी रेषा ओलांडताच तो अत्यंत विद्वान झाला व महाराजांनी त्याच्याकडून त्या दोन गर्विष्ठ ब्राह्मणांचा गर्वपरिहार केला.

उपरनिर्दिष्ट दोन ब्राह्मण आपल्या पापकर्माने ब्रह्मराक्षस झाले. या प्रसंगाच्या आधारे महाराजांनी वेदांचा विस्तार अमर्याद असून ते सर्वज्ञान आकलन करून घेणे अतिशय दुरापास्त आहे हे विशद करून सांगितले.

कर्मविपाक कथन भस्ममहिमा व रूद्राक्ष महिमा स्त्रीयांचा आचार धर्म
माहूर येथील श्रीमंत गोपीनाथ यांना दत्तात्रेयाच्या सादाने झालेल्या दत्त नावाच्या रोगी मुलास घेऊन त्यांची पतीपरायण सुन गाणगापुरास आली. तेथे येताक्षणीच तिच्या पतीस मृत्यू आला. त्या वेळी महाराज यतीवेषाने त्या स्थळी गेले व तिला विधवा स्त्रीचा धर्म व सती जाण्याचे तत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर पतीबरोबर सती जाण्याचा निश्चय करून तिने महाराजांस विनम्रभावे व श्रध्दायुक्त अंतःकरणाने वंदन केले. तेव्हा'अष्टपुत्रा सौभाग्यवती भव'असा आशिर्वाद महाराजांनी दिला. दिलेल्या आशिर्वादाचे सत्यत्व सिध्द करण्याकरिता महाराजांनी तिच्या पतीस पुनश्च जिवंत केले. त्या सुभगसमयी एखादे व्रत आचरण्यास सांगावे अशी तिने विनंती केल्यावर महाराजांनी सोमवार व्रताचा महिमा तिला विस्ताराने विशद करून सांगितला व ते व्रत आचरण्यास सांगितले. याच अनुषंगाने रूद्रसूक्त व रूद्राक्ष यांची महतीही सविस्तर निवेदन केली.

गाणगापुरात परान्न ग्रहण न करणारा एक सात्त्वि व गरीब ब्राम्हण होता. त्याच्या पत्नीला मिष्टान्न खाण्याची इच्छा झाली. स्वतःच्या निर्धनावस्थेची जाणीव असल्यामुळे आपल्या पतीला परान्न घेण्यास भाग पाडले असता मिष्टान्न मिळण्याची शक्यता आहे असे वाटल्यावरून ती महाराजांकडे आली व तिच्या पतीचे मन वळवून त्यांना परान्न घेण्यास वृत्त करावे अशी तिने महाराजांना विनंती केली. त्या प्रमाणे महाराजांनी त्या ब्राम्हणास बोलावून पत्नीस असंतुष्ट ठेऊ नकोस व तिच्या इच्छापूर्तीकरिता तू परान्नाचे आमंत्रण स्वीकारून भोजनास जावे असे त्याला सांगितले. तद्नुसार तो ब्राम्हण आपल्या पत्नीसह भोजनास गेला. ती जेवावयास बसली असता परान्नग्रहणदोषाचे मूर्तिमंत दृश्य महाराजांनी दाखविले. ते पाहून ती न जेवताच परत आली व तिचे मन परान्नास कायमचे विटले. या निमित्ताने महाराजांनी त्या ब्राम्हणास गृहस्थाश्रमाचा आचारधर्म विशद करून सांगितला.

अद्भुत अन्नपुर्ती वृध्द वंध्येला पुत्रप्राप्ती आणि शुष्क काष्ठास पालवी
महाराजांनी आपल्याकडे भिक्षा करावी असा हेतू अन्तरी बाळगून एक अत्यंत गरीब ब्राम्हण तीन माणसांना पुरेल इतकी शिधासामग्री घेऊन गाणगापुरास आला. परंतु तेथे सतत समाराधना चालू असल्यामुळे महाराजांना आमंत्रण देण्याची संधी त्याला प्राप्त होऊ शकली नाही. ब्राम्हणाच्या मनातील सद्भावना ओळखून महाराजांनी त्याच्याकडे भिक्षेस जाण्याचे ठरविले व तद्नुसार त्या ब्राम्हणाला आणलेल्या सामग्रीचा स्वयंपाक सिध्द ठेवण्यास सांगितले व त्याच प्रमाणे सर्व शिष्यांना भोजनाचे आमंत्रण देण्याची आज्ञा केली. महाराजांच्या आज्ञेनुसार सर्व सिध्दता झाली असता महाराजांनी ते सर्व अन्न झाकून ठेवण्यास सांगितले व त्यावर कमंडलूतील पाणी शिंपडले व झाकण न काढता त्यातील अन्न वाढावे असे सांगितले. केवळ तीन माणसांना पुरेल इतक्या स्वयंपाकाने गावातील सर्व माणसे जेवून तृप्त झाली. एवढेच नव्हे तर अन्न शिल्लक राहिले. ते उरलेले अन्न जलचरांकरिता म्हणून नदीत सोडण्यास महाराजांनी सांगितले.

गाणगापुरातील सोमनाथ नावाच्या एका ब्राम्हणाची गंगा ह्या नावाची साठ वर्षे वयाची भार्या महाराजांना नित्य आरती घेऊन येत असे. अशा प्रकारे बराच कालावधी लोटल्यानंतर महाराजांनी तिच्या मनातील हेतू विचारून तिला पुत्र व कन्या प्राप्त होतील असा आशीर्वाद दिला.

कुष्ठरोगाने ग्रस्त झालेला नरहरी नावाचा एक ब्राम्हण रोगाला कंटाळून महाराजांकडे आला. महाराजांनी त्याला औदुंबराचे सुकलेले एक लाकूड दिले व ते संगमाजवळ नदीकाठी रोपण करून त्यास नित्य पाणी घालण्यास सांगितले. ज्या दिवशी त्या सुकलेल्या काष्ठाला पालवी फुटेल त्या दिवशी तुझे कुष्ठ जाईल असे सांगितले. लोकांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून महाराजांच्या सांगण्या प्रमाणे त्याने आपला क्रम चालू ठेविले. शातव्या दिवशी महाराजांनी त्या शुष्क औदुंबर काष्ठावर कमंडलूतील उदक शिंपडताच त्या शुष्क काष्ठास पालवी आली व त्याच क्षणी त्या ब्राम्हणाचे कुष्ठ नाहीसे झाले व त्याचे शरीर सुवर्ण कांतिमय झाले.महाराजांनी त्या ब्राम्हणाला आशीर्वाद देऊन गाणगापुरास आपल्या कुटुंबासह येऊन राहण्याची आज्ञा केली.
मागील पान